Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > मुंबई

Shastrinagar Hospital

डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना जामीन; महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.


डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना जामीन महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट

Shastrinagar Hospital |

आठवड्यातून तीन वेळा स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक; व्हायरल व्हिडिओनंतर गाजलेल्या प्रकरणाला नवे वळण

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्यासाठी काही कठोर अटीही घालण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यभर चर्चेत राहिलेल्या या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे यांनी महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास राहणे आवश्यक असेल. ते ज्या राज्यात राहतील, तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावणे त्यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल होईपर्यंत ते गोव्यात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील सर्व चार आरोपींना जामीन देताना न्यायालयाने तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे काटेकोर पालन करणे आरोपींसाठी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कथित हल्ल्यानंतर विविध वैद्यकीय संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणात डॉ. वैभव साळुंखे, महिला डॉक्टर डॉ. सृष्टी बाविस्कर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण, धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून संतापाची लाट उसळली होती.

घटनेनंतर विष्णुनगर पोलिसांनी सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर विरोधी पक्ष आणि डॉक्टर संघटनांकडून रमेश म्हात्रे यांच्यावरही कारवाईची मागणी होताच पोलिसांनी त्यांनाही अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला.

या प्रकरणामुळे रमेश म्हात्रे यांच्या भूतकाळातील गुन्हेगारी नोंदींचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्यावर यापूर्वी हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख विविध माध्यमांत करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.

याचबरोबर, ज्या वैद्यकीय क्षेत्राने पूर्वी त्यांचे प्राण वाचवले, त्याच क्षेत्रातील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा झाली. 2008 मध्ये झालेल्या जीवघेण्या गोळीबारात रमेश म्हात्रे गंभीर जखमी झाले होते. गोळी त्यांच्या शर्टच्या खिशातील पेनाला लागून पोटात घुसली होती. त्यावेळी डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशानंतर या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि आरोपपत्र दाखल होण्याच्या प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: