Good touch-bad touch Training: ठाणेदार रवींद्र लांडे म्हणतात, राज्यात मुलींवरील अत्याचार वाढत असल्याने शाळांमध्ये ‘गुड टच-बॅड टच’ प्रशिक्षण काळाची गरज.
ठाणेदार रवींद्र लांडे यांचे प्रतिपादन
पातूर (Good touch-bad touch Training) : राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने समाजात तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरच मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’चे प्रशिक्षण देणे ही काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे प्रतिपादन ठाणेदार रवींद्र लांडे यांनी केले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील सदस्य उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडत असताना, काही विकृत प्रवृत्तीचे व्यक्ती निष्पाप मुलींना लक्ष्य करत असल्याच्या घटना समाजमन हेलावून टाकत आहेत. निरागसतेचा गैरफायदा घेत चिमुकल्यांवर होणारे अत्याचार केवळ कायद्याचा विषय नसून, तो समाजाच्या संवेदनशीलतेचीही कठोर परीक्षा ठरत आहे.
यावर प्रभावी प्रतिबंध घालण्यासाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम पुरेसा नसून विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. (Good touch-bad touch Training) मुलींना कोणता स्पर्श सुरक्षित आहे आणि कोणता धोकादायक आहे, हे लहान वयातच समजावून सांगितल्यास त्या कोणत्याही अनुचित प्रकाराविरोधात निर्भयपणे आवाज उठवू शकतील, असेही लांडे यांनी स्पष्ट केले.
अल्पवयीन मुलींना त्यांच्या भावना, भीती आणि अस्वस्थता ओळखता आली पाहिजे. चुकीच्या स्पर्शाविरोधात ‘नाही’ म्हणण्याचे धैर्य आणि तातडीने पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संवाद साधण्याची सवय विकसित होणे गरजेचे आहे. समाज, पालक आणि शाळा यांनी एकत्र येऊन मुलींच्या सुरक्षेसाठी संवेदनशील वातावरण निर्माण केल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी त्यांनी पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधण्याची गरज अधोरेखित केली. (Good touch-bad touch Training) मुलांच्या वागण्यात होणारे बदल, भीती किंवा मानसिक ताण याकडे दुर्लक्ष न करता त्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळांनीही विद्यार्थिनींसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करून समुपदेशनावर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि आत्मसंरक्षणाची भावना रुजण्यास मोठी मदत होणार असून, सुरक्षित आणि सशक्त समाज घडविण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.