Rojgar Hami Yojana: सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे रोजगार हमी योजनेत गंभीर भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे. रोजगार सेवक आत्माराम साबळे व संगणक परिचालक विजय हराळ यांच्यावर गुन्हा दाखल.
पाटोदा, धनगरवाडीनंतर आता कापडसिंगीचा 'नंबर'!
कापडसिंगी येथील रोजगार सेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सेनगाव (Rojgar Hami Yojana) : ग्रामीण भागातील गरिबांच्या हाताला काम देऊन त्यांना जगवणाऱ्या 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला' (रोहयो) सेनगाव तालुक्यात भ्रष्टाचाराची वाळवी लागली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पाटोदा आणि धनगरवाडी येथील (Rojgar Hami Yojana) रोजगार सेवकांवर झालेल्या कारवाईची शाई अद्याप वाळली नाही, तोच आता कापडसिंगी येथील रोजगार सेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन पंचायत समिती प्रशासनाने दिल्याने भ्रष्ट साखळीचे धाबे दणाणून सोडले आहेत.
सेनगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेतील अनियमिततेची मालिकाच सुरू आहे. प्रशासकीय तपासात एकामागून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे:
पाटोदा येथे कामात घोळ केल्याप्रकरणी रोजगार सेवकावर गुन्हा दाखल झाला. धनगरवाडीत मजुरांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला गेला. आता कापडसिंगीचे नाव या यादीत जोडले गेले असून, येथील रोजगार सेवक आत्माराम साबळे आणि संगणक परिचालक विजय हराळ यांची सेवा समाप्त करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यात एकामागून एक अशा घटना समोर येणे, हे दोन गोष्टींचे द्योतक आहे. एकीकडे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुरेश कांबळे (BDO) आणि त्यांची टीम भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे तालुक्यात रोहयोमध्ये किती मोठ्या प्रमाणावर 'नियोजित गैरप्रकार' झाले आहेत, याची ही साक्ष आहे. कापडसिंगी येथील चौकशी अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की, संबंधित कर्मचाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून कामात गंभीर अनियमितता केली. यामुळे केवळ नोकरीवरून काढून टाकणे पुरेसे नसून, त्यांच्यावर पोलीस कारवाई होणे गरजेचे आहे, हे प्रशासनाने ओळखले आहे.
मजुरांच्या घामावर डल्ला मारणारी साखळी
मजूर कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर करत असताना, गावातील हक्काच्या कामात जर अशा प्रकारे संगणमत करून डल्ला मारला जात असेल, तर ही गंभीर बाब आहे. पाटोदा आणि धनगरवाडीच्या घटनेतून इतर रोजगार सेवकांनी धडा घेतला नाही, हेच कापडसिंगीच्या प्रकरणावरून स्पष्ट होते.
पंचायत समिती प्रशासनाने चेंडू आता पोलिसांच्या आणि (Rojgar Hami Yojana) ग्रामपंचायत प्रशासनाच्या कोर्टात टाकला आहे. आदेश देऊनही गुन्हा दाखल होण्यास विलंब लागला, तर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे कापडसिंगीच्या या 'महाभागांवर' प्रत्यक्षात कधी गुन्हा दाखल होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सेनगाव तालुक्यात रोहयोमधील भ्रष्टाचाराचे एक मोठे 'रॅकेट' कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटोदा, धनगरवाडी आणि आता कापडसिंगी; ही केवळ हिमनगाचे टोक तर नाही ना? अशी चर्चा आता जनसामान्यात रंगू लागली आहे.