Sengaon Rural Hospital: राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी आपल्या पथकासह ग्रामीण रुग्णालय, सेनगाव येथे भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवा, सुविधा व व्यवस्थापन
सेनगाव (Sengaon Rural Hospital) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी आपल्या पथकासह ग्रामीण रुग्णालय, सेनगाव येथे भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवा, सुविधा व व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हास्तरीय वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
या (Sengaon Rural Hospital) पाहणी दौऱ्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस, सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिंडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जायभाये, जिल्हा प्रशासकीय अधिकारी डॉ. तावडे तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी गारुडी आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आरोग्य सेवा आयुक्तांनी रुग्णालयातील महिला व नवजात शिशू विभाग, सामान्य वॉर्ड, बाह्यरुग्ण विभाग, औषध वितरण कक्ष, प्रयोगशाळा, आयसीटीसी विभाग, आरबीएसके, शस्त्रक्रिया विभाग, आरकेएसके विभाग, आहार व्यवस्थापन तसेच बेडशीट व्यवस्थापन यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी वॉर्डमधील रुग्णांशी संवाद साधून उपलब्ध उपचार व सुविधांची माहिती घेतली.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड यांनी रुग्णालयात राबविण्यात आलेल्या सेवा, उपक्रम व सुधारणा यांचा सविस्तर अहवाल आयुक्तांसमोर सादर केला. त्यानंतर रुग्णालयातील कार्यपद्धती व व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, लिपिक, स्टाफ इन्चार्ज, परिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कक्ष सेवक, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आदी कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी विभागनिहाय माहिती सादर केली.
ग्रामीण आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रत्यक्ष पाहण्या महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.