Majha gaav Arodya Sampanna gaav: सेनगावात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचे उद्घाटन २५ एप्रिल रोजी झाले. या अभियानामुळे ग्रामीण आरोग्य सुधारण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर होणार आहे.
राज्यात अव्वल येण्याचा संकल्प
सेनगाव (Majha gaav Arodya Sampanna gaav) : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आरोग्यविकासाचा ध्यास घेत सुरू करण्यात आलेल्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा सेनगावात उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणेशा झाला. सातारकर महाराज मंदिर सभागृहात पार पडलेल्या तालुकास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याला विविध विभागांतील अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक गायकवाड होते. यावेळी (Majha gaav Arodya Sampanna gaav) प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, गट विकास अधिकारी ऋषीकेश होळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, सहाय्यक गट विकास अधिकारी माधव कोकाटे, बालविकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात विवेक गायकवाड यांनी अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना, “प्रथम स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणि त्यानंतर संपूर्ण गावाच्या आरोग्याची जबाबदारी उचलणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतींनी एकत्रितपणे कार्य करत ५९ निर्देशांकांची पूर्तता करून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर अग्रक्रमांकावर आणण्याचे आवाहन त्यांनी केले. “मेहनतीला पर्याय नाही; प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्याचे फळ निश्चितच मिळते,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
या अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या भरीव पुरस्कारांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींसाठी राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी रुपये, विभागस्तरावर प्रथम १ कोटी, तर जिल्हास्तरावर प्रथम २५ लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
तसेच आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांसाठीही आकर्षक पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी अभियानाची रूपरेषा मांडताना, “नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करणे, ही काळाची गरज आहे,” असे नमूद केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी गाव रोगमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले, तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी प्रास्ताविकातून अभियानाची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ अभियानांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५७ ग्रामपंचायतींचा विशेष गौरव करण्यात आला. सरपंच, समुदाय आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेविका व आशा वर्कर यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण वाबळे यांनी ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच, वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका, गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन गट विकास अधिकारी होळकर यांनी केले. एकूणच, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान केवळ योजना न राहता लोकचळवळ बनावी, यासाठी सेनगावातून सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात झाल्याचे चित्र या कार्यशाळेतून स्पष्ट झाले.