आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटगुल परिसरातील दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.
कोरची : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटगुल परिसरातील दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. कोणतीही अधिकृत पूर्वसूचना न देता गुपचूप पद्धतीने दौरा करून केवळ पक्षीय भेटीगाठी घेतल्याचा आरोप होत असून, गावातील ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांच्या दौऱ्याची कोणतीही माहिती प्रशासन, ग्रामपंचायत किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आली नव्हती. प्रोटोकॉलनुसार ग्रामपंचायतीला माहिती देणे अपेक्षित असताना कोटगुल व अरमुरकसा ग्रामपंचायतींना पूर्णतः अंधारात ठेवण्यात आले. या दौऱ्यात सार्वजनिक जनसंवाद टाळून केवळ काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच बैठक घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दौऱ्यातील सर्वात वादग्रस्त बाब म्हणजे देहानटोला येथील वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन. ग्रामपंचायत अरमुरकसा हद्दीतील या ट्रान्सफॉर्मरसाठी सरपंचांनी ग्रामसभेत वारंवार ठराव मंजूर करून विद्युत विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र उद्घाटनाच्या वेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही.
एका वीज वितरण कंपनीने बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटनासाठी आमदार स्वतः उपस्थित राहिले, पण गावच्या प्रथम नागरिकालाच डावलण्यात आल्याने, "हा कार्यक्रम नेमका कोणासाठी?" असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
कोटगुल परिसरातील आदिवासी बांधव अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त असताना आमदारांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नसल्याने संताप वाढला आहे.
प्रमुख मुद्दे
- अवैध कसीनो व खुलेआम दारू विक्री; युवापिढी धोक्यात.
- आश्रम शाळेतील इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनीशी संबंधित गंभीर प्रकरण प्रलंबित.
- वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे धान ऑनलाइन नोंद नसल्याने खरेदी रखडली; बोनसपासून वंचित.
- आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची गुप्त निवडणूक; जुनेच वादग्रस्त व्यवस्थापक.
"ट्रान्सफॉर्मर उद्घाटनाला वेळ आहे, पण जनतेच्या अडचणी ऐकायला वेळ नाही का?" असा रोखठोक सवाल कोटगुलकरांनी उपस्थित केला आहे.
ईश्वर कोरेटी, रामलाल मुलेटी, नारद फुलारे, विनोद कोरेटी, चिंताराम सोनफूल, ऐनसिंग कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, अविनाश हारामी, गजेंद्र मडावी, अर्जुन मुलेटी, पुरुषोत्तम कोल्हे, शंकर सोरी, पवन मडावी, राजेश नैताम, देवराम हिडको, कमल नैताम, सौ. गिरजाबाई कोरेटी, सौ. केवराबाई सोनफुल, सौ. संगीताबाई कोरेटी आदी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमदारांनी तातडीने भूमिका स्पष्ट करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. या गंभीर आरोपांनंतर आमदार रामदास मसराम काय स्पष्टीकरण देतात आणि जिल्हा प्रशासन कोटगुलच्या प्रश्नांकडे कितपत लक्ष देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.