सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका शिक्षकाने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली.
लोणी गवळी (School Incident) : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका शिक्षकाने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. ही बाब समजताच संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला चोप दिला.
महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) असे या शिक्षकाचे नाव असून, ते येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार होते. लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या या शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.
मागील काही दिवसांपासून तो आपल्या वर्गातील काही मुलींशी गैरवर्तन करत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ८ एप्रिल रोजी त्याने तिघी विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मुलींनी आपल्या पालकांना दिल्यानंतर संतप्त पालकांनी सकाळी सुमारे दहा वाजता शाळेत जाऊन शिक्षकाला मारहाण केली.