उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाईची मागणी; ४८ तासांचा अल्टिमेटम, तर वैशाली नागवडे यांनीही काँग्रेसवर साधला निशाणा
पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी झालेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी काँग्रेसवर तीव्र टीका करत, शरद पवार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. याचवेळी काँग्रेसने संबंधित नेत्यावर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काकडे म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा घाणेरडी झाली असून सुनेत्रा पवारांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य झाल्यानंतरही शरद पवार शांत का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी शरद पवारांनी काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणी केली.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. संबंधित प्रकरणात पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४८ तासांनंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
इंदिरा गांधी यांनाही भूतकाळात ‘गुंगी गुडिया’ अशी उपमा देण्यात आली होती, त्यावेळी देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता, अशी आठवण करून देत काकडे म्हणाले की, विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर न जाता वैचारिक आणि राजकीय टीका करावी. सुनेत्रा पवारांबाबत झालेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महायुती रस्त्यावर उतरणार असून काँग्रेसच्या नेत्यांना राज्यभर विरोधाचा सामना करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस आणि शरद पवार गटातील नेते काय भूमिका घेतात, याकडे आता राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी वैशाली नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना नागवडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे सांगितले. नियुक्तीपत्र सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मिळाल्याने जबाबदारी आणखी वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांना ‘कामाचा माणूस’ म्हणून मिळालेली ओळख अधिक व्यापकपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करू, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात यापूर्वीच या मुद्द्यावर आंदोलन केल्याची माहिती देत त्यांनी महाराष्ट्राची शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित परंपरा असल्याचे नमूद केले.
सुनेत्रा पवार यांनी मोठ्या वैयक्तिक दुःखातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला असून त्यांच्या पदाचा आणि जबाबदारीचा आदर राखून वक्तव्य केले पाहिजे होते, असे नागवडे म्हणाल्या. बारामतीतील निवडणुकीत सहकार्याची भाषा करायची आणि त्याचवेळी अशा प्रकारची टीका करायची, हे काँग्रेसला शोभणारे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
पक्ष संघटनेत प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक असल्याचे सांगत नागवडे म्हणाल्या की, पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहतो. नेत्यांबद्दल असलेल्या भावनिक नात्यातून सूरज चव्हाण यांनी संबंधित कृत्य केले असावे. मात्र, भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.