गट ग्रामपंचायत एकलारा, गुंडी व वाटोद येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती अपुरी, चुकीची आणि विलंबाने पुरवल्याचा आरोप अर्जदार अर्जुन मारोती खिरोडे यांनी केला आहे
५ दिवसांत कारवाई न झाल्यास द्वितीय अपिलाचा इशारा!
मानोरा (RTI Act) : तालुक्यातील गट ग्रामपंचायत एकलारा, गुंडी व वाटोद येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती अपुरी, चुकीची आणि विलंबाने पुरवल्याचा आरोप अर्जदार अर्जुन मारोती खिरोडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला असून, ५ दिवसांत कारवाई न झाल्यास राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करण्याचा इशारा दिला आहे.
अर्जदार खिरोडे यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. माहिती न मिळाल्याने त्यांनी दि. १० मार्च २०२६ रोजी प्रथम अपील दाखल केले. त्यानंतर ग्रामपंचायत सचिवांनी दि. २२ एप्रिल २०२६ रोजी माहिती दिली. मात्र, दिलेली माहिती अपुरी व चुकीची असून मुद्दाम विलंबाने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, सचिवांनी कव्हरिंग लेटरमध्ये अर्जदार माहिती घेण्यास टाळाटाळ करत होता, असा उल्लेख केला आहे. मात्र अर्जदाराने ९ महिन्यांनंतर अपील केले असल्याने ते माहिती घेण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट होते. तसेच नमुना ८ अ आणि असेसमेंट रजिस्टर नमुना ८ अ यांच्या प्रती सविस्तर व क्रमाने न देता सचिवांनी जाणूनबुजून अपुरी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अर्जदाराने गटविकास अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, आपल्या स्तरावरून तातडीने कारवाई करण्यात यावी. जर ५ दिवसांच्या आत कारवाई करून पत्राचे उत्तर दिले नाही, तर राज्य जनमाहिती आयोगाकडे द्वितीय अपील करण्यास आपण कायदेशीर पात्र राहू, असेही अर्जात नमूद केले आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायत स्तरावरील माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.