रिसोड येथील पंचायत समितीच्या अभिलेख कक्षाला (रेकॉर्ड रूम) १५ मे रोजी रात्री सुमारे ८:१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.
रिसोड (Risod Fire) : रिसोड येथील पंचायत समितीच्या अभिलेख कक्षाला (रेकॉर्ड रूम) १५ मे रोजी रात्री सुमारे ८:१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास पंचायत समितीच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना अभिलेख कक्षातून धूर निघताना दिसला. त्यांनी तातडीने ही माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नगरपरिषद अग्निशमन दलाला पाचारण केले.

अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होताच पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पंचायत समितीचे कर्मचारी यांनीही जीवाची बाजी लावत आग विझवण्याचे प्रयत्न केले. या आगीत रेकॉर्ड रूममधील काही महत्त्वाची कागदपत्रे आणि दस्तऐवज जळाले असले तरी, वेळीच आग आटोक्यात आणल्याने इतर महत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला यश आले.
आग नेमकी कशामुळे लागली याचे अधिकृत कारण अद्याप समोर आले नसून, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.
यांनी घेतले परिश्रम
या घटनेत आग विझवण्यासाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी दत्ता ढवणे, शाखा अभियंता विजय इंगोले, वरिष्ठ सहाय्यक सुरेश नवघरे यांच्यासह अग्निशमन विभागाचे चालक ताजेकोद्दीन उर्फ कालुभाई, फायरमन संजू पवार आणि नगरपरिषद कर्मचारी शिवाजी शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सतर्कता आणि तत्परतेमुळे पंचायत समितीचे मोठे नुकसान टळले आहे.