नागपूरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्यानेच गंभीर गैरकृत्य केल्याचा आरोप होत आहे.
नागपूर : ‘रक्षणकर्ताच भक्षक’ – निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर १४ वर्षे शोषणाचा आरोप
नागपूर (Retirement Police Scandal) : नागपूरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला असून, कायद्याचे रक्षण करणाऱ्यानेच गंभीर गैरकृत्य केल्याचा आरोप होत आहे. कोराडी पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस कर्मचारी सुरेश विश्वनाथ सेजोव (वय ५७) यांच्यावर एका ५० वर्षीय महिलेने तब्बल १४ वर्षांपासून शारीरिक शोषण, मारहाण आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
ओळखीपासून अत्याचारापर्यंतचा प्रवास
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०११ मध्ये मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी ती पाचपावली पोलीस ठाण्यात गेली होती. त्या वेळी तेथे कार्यरत असलेल्या सुरेश सेजोव यांनी मदतीच्या बहाण्याने तिच्याशी ओळख वाढवली. “माझे पत्नीशी पटत नाही, मी एकटाच राहतो,” असे सांगून त्यांनी विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.

१४ वर्षे सुरूच अत्याचार
२०११ ते २०२५ या कालावधीत आरोपीने बेलतरोडी, कोराडी आणि वैशाली नगर परिसरात भाड्याने खोल्या घेऊन पीडितेचा वारंवार शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. आरोपी विवाहित असून त्याला मुले असल्याचे समजल्यावर महिलेला मारहाण करून गप्प बसण्याची धमकी देण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे.
लंडन सहलीचा खर्चही पीडितेकडून
या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, २०२३ मध्ये आरोपीने लंडन सहलीचा संपूर्ण खर्चही पीडितेकडून करून घेतला. तरीही लग्नाचे आश्वासन देत तिची फसवणूक सुरूच ठेवली.
निवृत्तीनंतर नकार आणि धमक्या
जानेवारी २०२५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिला. तसेच शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप महिलेनं केला आहे.
‘सेटलमेंट’चा आरोप; पोलिसांवरही प्रश्नचिन्ह
पीडित महिलेने यापूर्वी कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्या वेळी पोलिसांनी आरोपीसोबत तडजोड घडवून आणल्याचा आरोप आहे. आरोपी निवृत्त झाल्यानंतर “हा आमच्या हद्दीतील विषय नाही” असे सांगून मदत नाकारल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तपासावरही आक्षेप
महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा तपास महिला अधिकाऱ्यांकडून होणे अपेक्षित असताना, या प्रकरणात पुरुष पोलीस अधिकारी तपास करत असल्याचा आक्षेप पीडितेने घेतला आहे.
सध्या पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.