पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये झालेल्या धार्मिक प्रवचनावरून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला आहे.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमांतर्गत खडक पोलिसांत कारवाई; पुणे शहरात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल
पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये झालेल्या धार्मिक प्रवचनावरून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर खडक पोलीस ठाण्यात ब्रिटिश नागरिक असलेल्या धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमाला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्याअंतर्गत पुण्यात नोंद झालेल्या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये या गुन्ह्याचा समावेश आहे.
तक्रारदारांनी संबंधित चर्चमध्ये होणाऱ्या प्रवचनांमधून भाविकांना धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
प्रवचनादरम्यान नेमक्या कोणत्या धार्मिक बाबी मांडण्यात आल्या होत्या, त्यातून धर्मपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न झाला होता का, तसेच ब्रिटिश नागरिक असलेल्या संबंधित धर्मगुरूला भारतात वास्तव्य करून धार्मिक प्रचार किंवा प्रवचन करण्याची कायदेशीर परवानगी होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
महाराष्ट्रातील मूळ, ब्रिटनचे नागरिकत्व
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित धर्मगुरू मूळचा महाराष्ट्रातील आहे. मात्र, सध्या त्याच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असून तो भारतात कायमस्वरूपी राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून तो पुण्यात वास्तव्यास होता. गुरुवार पेठेतील चर्चमध्ये यापूर्वीही त्याने अनेक प्रवचने आणि धार्मिक कार्यक्रम घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना प्रलोभन किंवा इतर मार्गाने धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. हा आरोप समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पुण्यात नव्या कायद्यांतर्गत दोन गुन्हे
दरम्यान, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पुणे शहरात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे.
यातील पहिला गुन्हा ५ ऑगस्ट रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. या प्रकरणात फिर्यादीच्या मुलीवर अत्याचार करून तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
दुसरा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, गुरुवार पेठेतील चर्चमधील प्रवचनाशी संबंधित प्रकरणाचा त्यात समावेश आहे. संबंधित व्यक्तीने धर्मपरिवर्तनाचा प्रत्यक्ष प्रयत्न केला होता का, प्रवचनात नेमके काय सांगण्यात आले आणि नव्या कायद्यातील कोणत्या तरतुदी या प्रकरणाला लागू होतात, हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दोन्ही प्रकरणांचा पोलीस सखोल तपास करत आहेत.