Ramwadi Power Supply: रामवाडी फीडरवर रात्रीच्या सिंगल फेज वीज पुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अंधारामुळे धोक्याचा समस्या होत आहे. चोरांचा धोका अधिक वाढ आहे
कळमनुरी (Ramwadi Power Supply) : कळमनुरी तालुक्यातील मसोड सब-स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामवाडी फीडरवरील सिंगल फेज वीज पुरवठा बंद असल्यामुळे शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा नियमितपणे सुरू करण्यात यावा, अशी मागणी मसोड परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली
रामवाडी फीडरवर एकूण आठ डी.पी. (रोहित्रे) असून या भागातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. यापैकी जवळपास ५० टक्के शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतातच वास्तव्यास आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने शेत परिसरात साप, विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. मात्र (Ramwadi Power Supply) रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय अलीकडेच एका शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोलर पॅनेलची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. वीज पुरवठा नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षेसाठी लावलेले दिवे कार्यरत ठेवणे कठीण होत असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यापूर्वी या भागात रात्री सिंगल फेज वीज पुरवठा (Ramwadi Power Supply) उपलब्ध होता. मात्र सध्या तो बंद करण्यात आल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी काळात पावसाळ्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असल्याने जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मसोड सब-स्टेशन अंतर्गत रामवाडी फीडरवरील सर्व आठ डी.पी.वर रात्रीच्या वेळी तातडीने आणि नियमितपणे सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अन्यथा अंधारामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी चोरी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. अभियंता श्री. जयस्वाल यांनी या निवेदनाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.