सध्या सर्वत्र ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
ऐ यश मित्र मंडळाच्या वतीने आयोजन; हजारो शिवभक्तांची उपस्थिती
पानकनेरगाव (Raja Shivaji Movie) : सध्या सर्वत्र ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काही ग्रामीण भागांमध्ये या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपणही केले जात आहे.
सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे ऐ यश मित्र मंडळाच्या वतीने १६ मे रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ‘राजा छत्रपती’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात आले. या वेळी हजारो शिवभक्तांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘राजा शिवाजी’ या छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण पाहण्यासाठी काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.
१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनेक बॉलिवूड कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. Riteish Deshmukh, Salman Khan, Genelia D'Souza, Sanjay Dutt, Bhagyashree, Vidya Balan, Abhishek Bachchan, Fardeen Khan, Sachin Khedekar, Mahesh Manjrekar आणि Jitendra Joshi यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी होत असताना सर्वसामान्य शिवभक्तांना हा चित्रपट मोफत पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऐ यश मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
चित्रपट पाहण्यासाठी गावातील जिजाऊंच्या लेकी आणि शिवरायांचे शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. ‘राजा छत्रपती’ चित्रपटातील दृश्ये पाहताना शिवभक्तांच्या अंगात उत्साह संचारला. विशेषतः अफजलखानाचा वध दाखविणाऱ्या दृश्यावेळी उपस्थितांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत परिसर दुमदुमून सोडला.
हा क्षण केवळ घोषणांचा नसून प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयातून उमटलेली आदरांजली असल्याचे जाणवत होते. मराठी माणसासाठी आणि शिवभक्तांसाठी हा अत्यंत अभिमानास्पद आणि भावनिक अनुभव ठरला. ‘राजा छत्रपती’ चित्रपट पाहण्याचा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.