राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि कोचिंग क्लासेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी; सिंहस्थ कुंभमेळा, नाशिकची दुरवस्था आणि कंत्राटी व्यवस्थेवरही सरकारला धारेवर
नाशिक : देशभरात चर्चेत असलेल्या NEET परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटी प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि कोचिंग क्लासेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे. शिक्षण क्षेत्रात कोचिंग क्लासेसचा वाढता प्रभाव धोकादायक ठरत असल्याचा आरोप करत, आतापर्यंत झालेल्या NEET पेपरफुटीच्या घटना कोचिंग क्लासेसमधूनच घडल्या, असा गंभीर दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक भार वाढत असून, या संपूर्ण व्यवस्थेकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिक दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी NEET परीक्षा घोटाळा, सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी, नाशिकमधील रस्त्यांची अवस्था तसेच गुजरातच्या कंत्राटदारांना दिल्या जाणाऱ्या कामांवरून सरकारवर जोरदार टीका केली.
शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील वाढत्या अनागोंदीविरोधात अनेक वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा संताप उघडपणे व्यक्त होत आहे. तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई पाहून प्रत्येक पालकाला ती वेदना स्वतःच्या मुलावर झाल्यासारखी वाटत आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात असून, भविष्यात हा असंतोष अधिक तीव्र होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.
'कोचिंग क्लासेस शिक्षणाचा मोठा व्यवसाय'
कोचिंग क्लासेसवर टीका करताना त्यांनी विचारले की, दहावीनंतर विद्यार्थी कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणार हे आता कोचिंग क्लासेस ठरवणार का? शिक्षण हा मोठा व्यावसायिक उद्योग बनल्याचा आरोप त्यांनी केला. कॉलेजची फी सुमारे २० हजार रुपये आणि कोचिंग क्लासेसची फी तब्बल १ लाख रुपये असल्याची तफावत अधोरेखित करत, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी दगड-मातीवरील ठसे किंवा आधार पडताळणीसारख्या बाबींवर भर देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
नाशिकच्या विकासकामांवरही निशाणा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी सांगितले की, २०१५ चा कुंभमेळा त्यांच्या कार्यकाळात नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पडला होता, कारण त्यामागे आर्थिक स्वार्थ नव्हता. त्या काळात नाशिक शहराचा विकास सर्वांनाच जाणवला होता. मात्र, सध्या शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून प्रशासन निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी केली.
कामांमधून कमिशन मिळवण्यावरच भर असल्याचा आरोप करत, महाराष्ट्रात सक्षम कंत्राटदार असतानाही गुजरातच्या कंत्राटदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वरून आदेश येतात आणि त्यानुसार निर्णय घेतले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, २०१३ मध्ये नाशिक सुंदर बनवण्याचे काम करण्यात आले होते, मात्र आता शहराची अवस्था बिघडत चालली आहे. झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असून शहरांचे नियोजन बिघडले आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, एवढे सर्व घडूनही नागरिक पुन्हा भाजपलाच निवडून देत असतील तर त्याचे परिणामही स्वीकारावे लागतील, असा टोला त्यांनी लगावला.