Hingoli Pipeline Blast: हिंगोलीत रेल्वे ब्रिज परिसरातील मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठा छिद्र दिसून आला. यामुळे हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे
हिंगोली (Hingoli Pipeline Blast) : शहरातील रेल्वे ब्रिजजवळ असलेल्या नगरपालिकेच्या मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठे छिद्र पडल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या घटनेमुळे परिसरातील रस्त्यावर पाणी साचले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारपासून रेल्वे ब्रिज परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे पिण्याचे शुद्ध पाणी चिखलात मिसळून वाया जात आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना या पाण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते, आणि आता एवढे पाणी उघड्यावर वाया जात आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पाईपलाईन दुरुस्त करावी" अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाण्याची होणारी नासाडी थांबवण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पथक पाठवून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.