रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २३ एप्रिल रोजी सायंकाळी एक भीषण अपघात घडला.
रायगड (Raigad Accident) : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात २३ एप्रिल रोजी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत बाईकस्वार दांपत्य सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडले. दाट धुके, घसरण्याजोगा रस्ता आणि घाटातील तीव्र वळण यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर दुचाकी बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळली. त्यामुळे दुचाकीवरील प्रवासी दरीत पडल्याचा संशय निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
कठीण परिस्थितीत राबवलेल्या शोधकार्यात सुमारे ७०० फूट खोल दरीत मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) यांचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनास्थळी अवकाळी पाऊस, दाट धुके आणि घसरणारा उतार यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. कमी दृश्यमानता आणि खोल दरीमुळे रेस्क्यू पथकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. जीव धोक्यात घालून बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
घटनेनंतर पोलादपूर आणि महाबळेश्वर येथील पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून बचावकार्य पार पाडण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
आंबेनळी घाट हा धोकादायक वळणं आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात रस्ता निसरडा होत असल्याने अपघातांची शक्यता वाढते. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, सतर्क राहावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.