उदगीर तालुक्यातील नांदेड रोडवरील अशोका पॅलेस हॉटेलमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला.
कुंटणखाना चालविणाऱ्या एकास अटक; चौघांची चौकशी, पीडित महिलांना लातूरच्या महिला सुधारगृहात हलविले
उदगीर : उदगीर तालुक्यातील नांदेड रोडवरील अशोका पॅलेस हॉटेलमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलांना बोलावून वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पाच महिला पीडितांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालविणाऱ्या अहमद जलील बागवान (वय ३३, रा. बोधन नगर, जळकोट रोड, उदगीर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अहमद बागवान हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना हॉटेलवर बोलावून घेत होता. त्यानंतर परिसरातील तसेच शहरातील पुरुष ग्राहकांना हॉटेलवर बोलावून महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.
१३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.०१ वाजण्याच्या सुमारास अशोका पॅलेस हॉटेल येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना घटनास्थळी पाच महिला पीडितांसह एक पुरुष आरोपी मिळून आला. याशिवाय परिसरातील आणखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांनी सुटका केलेल्या पाचही महिलांना लातूर येथील महिला सुधारगृहात ठेवले असून, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५, ७ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप गाडे हे करीत आहेत.