Pragya Satav: डॉ. प्रज्ञा सातव यांचे विधान परिषदेवर जाणे निश्चित झाले असून, त्यांच्या नावाची घोषणा केवळ औपचारिकता शिल्लक आहे. विधान परिषदेच्या नव्या जागांसाठी निवडणुक होणार.
हिंगोली (Pragya Satav) : काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय नेते अॅड. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांचे भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेवर जाणे निश्चित असुन केवळ औपचारीकता बाकी असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे.
काँग्रेस पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये असलेले व गांधी कुटूंबीयांचे निकटस्थ मानले जाणारे अॅड. राजीव सातव देशात मोदी लाट असताना हिंगोलीतून निवडूण आले होते. त्यानंतरची निवडणूक त्यांनी लढविली नव्हती. काँग्रेस पक्षाने पुढे त्यांना राज्यसभेवर घेतले. कोरोना काळात त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँगेसने डिसेंबर २०२१ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर घेतले. शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांना जुलै २०२४ पर्यंत संधी ही मिळाली होती. हा कार्यकाळ पुर्ण झाल्यावर पक्षाने त्यांना संपूर्ण सहा वर्षांसाठी जुलै २०२४ मध्ये पुन्हा विधान परिषदेवर पाठविले. या निवडीनंतर १७ महिन्यांनी डॉ. प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेसोबत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला व भारतीय जनता पक्षात सामिल झाल्या. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेचे नेते पद हुकले. विधान परिषदेच्या नव्याने रिक्त झालेल्या ९ जागांसाठी व प्रज्ञा सातवांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी १२ मे रोजी निवडणुक होणार आहे.
या निवडणुकांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष पराभूत नेत्यांना संधी देईल की, नाही बाहेरून आलेल्यांची वर्णी लागेल की, जून्या निष्ठावंतांना संधी मिळेल, यावर खलबेत सुरू असली तरी या सगळ्या चर्चा केवळ ९ जागांसाठी आहेत. १० व्या जागेवर प्रज्ञा सातवांचा दावा पक्का असल्याने त्यांचे केवळ नाव जाहीर होण्याची औपचारीकता शिल्लक असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. यामध्ये बघण्यासारखे केवळ इतकेच की, प्रज्ञा सातवांना जुन्याच जागेवर उमेदवारी मिळाली तर त्यांचा कार्यकाळ २०३० मध्ये संपेल आणि नवीन ९ जागांमधून उमेदवारी मिळाली तर २०३२ पर्यंतचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे.