Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; शिवसेनेच्या 'धडक' मोर्चाने MSEB कार्यालय हादरले!

मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा बांध अखेर फुटला!


महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक शिवसेनेच्या धडक मोर्चाने mseb कार्यालय हादरले

Power Theft Issue |

"तारा चोरी, शेतं जळीत, पोल रस्त्यात... शेतकरी जगणार कसा?" - संतप्त सवाल

मलकापूर (Power Theft Issue) : मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा बांध अखेर फुटला! वीजेच्या लपंडावाने, तारांच्या चोऱ्यांनी आणि महावितरणच्या बेफिकीर कारभाराने त्रस्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आज शिवसेनेच्या भगव्याखाली महावितरणच्या बिर्ला रोडवरील कार्यालयावर अक्षरशः 'धडक' दिली. 

"साहेब, आमच्या शेतातले पोल चोरून नेले, मक्का जाळून खाक झाला... आता आम्ही काय विष खाऊन मरायचं का?" असा आर्त टाहो फोडत शेतकरी कार्यालयात घुसले तेव्हा अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या एका हाकेवर जांभुळधाबा, बेलाड, वाघूळ, भाडगणी, म्हैसवाडीपासून ते वाकोडीपर्यंतचा शेतकरी लोटला होता. कार्यकारी अभियंता तायडे साहेब मात्र 'साईट व्हिजिट'च्या नावाखाली गायब! शेवटी उपविभागीय अभियंता खान साहेबांना पुढे येऊन संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

चोरीचे सत्र थांबेना - 80 पेक्षा जास्त पोल उघडे!

"आमच्या शेतातले तार चोर नेतात आणि महावितरण झोपा काढतं का?" असा जळजळीत सवाल करत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जांभुळधाब्यात 19 पोल, वाघूळमध्ये 40 पोल, म्हैसवाडीत 21 पोल... एक-दोन नव्हे, तर तालुकाभरात 80 पेक्षा जास्त पोलवरच्या तारा चोरांनी लंपास केल्या आहेत. बेलाड येथे धनंजय संबारे यांच्या शेतातील ताराही 6 महिन्यांपासून गायब! "वीज नाही, पाणी नाही... शेती करायची कशी?" शेतकऱ्यांचा सवाल.

शॉर्ट-सर्किटने होरपळला संसार - 155 आर मक्का राख!

वाघोळा येथील कांडेलकर कुटुंबावर तर आभाळच कोसळले. 3 मे रोजी लोंबकळत्या तारांनी पेट घेतला आणि 155 आर उभी मक्का जळून खाक झाली. "महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आमचा घास हिरावला गेला. आता पंचनामा करून तोंडाला पाने पुसणार का?" असा संतप्त सवाल करत सरला कांडेलकर यांनी टाहो फोडला.

शेतात डीपी, रस्त्यात पोल - मृत्यूचे सापळे!

खामखेडच्या विनोद ठोंबरेंच्या शेतात ऐन मध्यभागी डीपी ठोकलीय. "ट्रॅक्टर फिरवायला जागा नाही, पेरणी कशी करू?" त्यांचा सवाल. तर वाकोडी व मलकापूर शहरात रस्त्याच्या मधोमध पोल उभे करून मृत्यूचे सापळे रचले आहेत. "एखाद्याचा जीव गेल्यावर जागे होणार का?" संतोष सपकाळ व गजानन वराडे यांनी विचारणा केली.

"आश्वासन नको, ॲक्शन हवी!" - दिपक चांभारे पाटील यांचा इशारा

निवेदन स्वीकारताना उपविभागीय अभियंता खान साहेब यांनी "तातडीने कारवाई करू" असे आश्वासन दिले. मात्र, यावर शेतकरी समाधानी नाहीत. "गेली 6 महिने आश्वासनंच ऐकतोय. आता 15 दिवसांत तारा बसल्या नाहीत, डीपी हलल्या नाहीत, तर महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही," असा सज्जड इशारा शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी यावेळी दिला.

"आम्ही मेलो तरी चालेल, पण आमच्या पोराबाळांना उपाशी मरू देणार नाही!" अशी गर्जना करत शेतकरी परतले. आता चेंडू महावितरणच्या कोर्टात आहे. बघूया, आश्वासनांचे 'करंट' शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की पुन्हा आंदोलनाची 'शॉर्ट-सर्किट' होते!

Related to this topic: