Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > मुंबई

शिवतीर्थवरील भेटीमागे काय? बावनकुळे–राज ठाकरे भेटीने वाढली उत्सुकता

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.


शिवतीर्थवरील भेटीमागे काय बावनकुळे–राज ठाकरे भेटीने वाढली उत्सुकता

Political Meeting |

मुंबई (Political Meeting) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्याला कारण ठरली ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात झालेली अचानक भेट. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, या भेटीमागे नेमके काय कारण असावे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचा प्रभाव कायम असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेत निवडून आला नसला तरी त्यांच्या भाषणांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. विशेषतः राज्यातील तरुण वर्गामध्ये त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते. मराठी अस्मितेचा मुद्दा असो किंवा स्थानिक प्रश्न, राज ठाकरे नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यांच्या भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा असतो. मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्तेही तितक्याच आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरतात.

अलीकडेच राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चांगलाच गाजला. राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनसेने कडाडून विरोध केला होता. या आंदोलनानंतर सरकारने अखेर या परीक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे हे अचानक मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी त्यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमागे राजकीय समीकरणे बदलण्याचा काही डाव आहे का, की केवळ शिष्टाचार भेट होती, याबाबत विविध स्तरांवर चर्चा रंगत आहे.

विशेष म्हणजे, भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे हे माध्यमांशी कोणताही संवाद न साधता निघून गेले. पत्रकारांनी भेटीमागील कारण विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या भेटीचे गूढ अधिकच वाढले आहे.

सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. आगामी निवडणुका, बदलते राजकीय समीकरण आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले वातावरण यांचा या भेटीशी काही संबंध आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून अधिकृत भूमिका समोर येते का, याची उत्सुकता कायम आहे.

Related to this topic: