शिवसेनेने गायकवाड यांच्या वक्तव्यापासून हात झटकत स्पष्टपणे पाठराखण करण्यास नकार दिला आहे.
कोल्हापूर (Political Controversy) : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर झाला असून हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गायकवाड यांच्या वक्तव्यापासून हात झटकत स्पष्टपणे पाठराखण करण्यास नकार दिला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संजय गायकवाड यांच्या वक्तव्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. पक्ष अशा भाषेचे समर्थन करत नाही.” तसेच, आमदारांनी बोलताना संयम बाळगणे अपेक्षित असून वापरलेली भाषा अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरण नेमके काय?
सुमारे ३७ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आक्षेपार्ह वाटल्याने संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्याशी अर्वाच्य भाषेत संवाद साधल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या घटनेविरोधात प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांची भूमिका काय?
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्यास नकार देत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. पोलिसांनी तक्रारीची पोचपावती दिली असून दोन दिवसांत पुढील निर्णय कळवण्यात येईल, अशी माहिती प्रशांत आंबी यांनी दिली.
राजकीय घडामोडींना वेग
या प्रकरणात आता आमदार रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ते राजारामपुरी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या सामूहिक वाचन कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गायकवाड यांच्या भूमिकेला काही प्रमाणात समर्थन दिले होते. मात्र, आता शिवसेनेच्या अधिकृत भूमिकेमुळे गायकवाड यांची अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवीन पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया
दरम्यान, कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकरणाबाबत माहिती घेतली जाईल, असे सांगितले. “कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेतली जाईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.