नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली असून, मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. जवळपास ४० दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला पोलिसांनी गुप्त कारवाई करत ताब्यात घेतले असून, आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नगरसेवकाच्या मदतीने लपून राहत होती?
या प्रकरणात आता राजकीय कनेक्शन समोर आले आहे. तपासादरम्यान एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला संभाजीनगरमध्ये लपण्यासाठी मदत केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘त्या’ फ्लॅटमध्ये होता मुक्काम
माहितीनुसार, मतीन पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी नारेगाव परिसरातील कौसर पार्क येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. याच फ्लॅटमध्ये निदा खान गेल्या काही दिवसांपासून राहत होती. तिच्यासोबत आई-वडील, भाऊ आणि मावशीही राहत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांना याची कोणतीही कल्पना नव्हती.
गुप्त पाळत आणि मध्यरात्री छापा
नाशिक पोलिसांना निदा खानच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. साध्या वेशातील सुमारे २० पोलिसांनी दोन दिवस परिसरावर पाळत ठेवली. तांत्रिक तपासातून खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून तिला अटक करण्यात आली.
जामिनाआधीच अटक
निदा खानने अटकेपासून बचावासाठी गरोदर असल्याचे कारण देत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र नाशिक न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर ती उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली.
गंभीर आरोप आणि तपासाचा विस्तार
निदा खानवर धार्मिक भावना दुखावणे, महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे, तसेच विशिष्ट धर्माचे प्रशिक्षण देण्याचे आरोप आहेत. तपासात धर्मांतराशी संबंधित मोठे जाळे, आर्थिक व्यवहार आणि संभाव्य परकीय निधी यांचाही तपास सुरू आहे.
सहआरोपींची चौकशी तीव्र
या प्रकरणात आधीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुन्हा ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. गुंगीकारक पदार्थांचा स्रोत, बँक व्यवहार आणि फंडिंग याबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.
राजकीय प्रतिक्रिया तापल्या
या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. काही नेत्यांनी या प्रकरणात मोठ्या षडयंत्राचा आरोप केला असून संबंधित राजकीय नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, नाशिक पोलिसांनी या प्रकरणात तपासाचा वेग वाढवला असून, निदा खानच्या अटकेनंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.