Liquor Store Raid: वाई शिवारातील छापा मधील घटनेत पोलिस कर्मचारीवर गुप्तीने हल्ला झाला. गुप्तीने जमादार सतीष जाधव यांच्यावर वार केला आणि एक कर्मचारी जखमी झाला.
कळमनुरी तालुक्यातील वाई शिवारातील घटना
कळमनुरी (Liquor Store Raid) : कळमनुरी तालुक्यातील वाई शिवारात अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यावर गुप्तीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला असून, तिघांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार १ जुन रोजी रात्री घडली.
पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी विशेष पथके कार्यरत आहेत. वाई शिवारातील एका शेतात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे जमादार सतीष जाधव व लिंबाजी वाहुळे यांच्या पथकाने तातडीने छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूचा साठा जप्त केला. त्याचवेळी बबलू उर्फ हनुमानसिंग टाक, त्याचा भाऊ करतारसिंग टाक आणि आणखी एकजण तेथे आले. दोनच पोलिस कर्मचारी असल्याचे पाहून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, (Liquor Store Raid) आरोपींनी शिवीगाळ करून "ट्रकने उडवून लावू" अशी धमकी दिली. वाद वाढत असताना आरोपींपैकी एकाने जवळील गुप्ती काढून जमादार जाधव यांच्यावर वार केला. जाधव यांनी वार चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या बोटाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सपोनि रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक सतीष ठेंगे व माधव जिव्हारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येत असल्याचे पाहून तिन्ही आरोपी फरार झाले.
जमादार जाधव यांच्या फिर्यादी वरून बबलू टाक, करतारसिंग टाक व अन्य एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे व जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे करत आहेत.