बालकांमधील गंभीर आजार तसेच आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीच्या व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सर्पदंश, विंचूदंश, दमा आणि आकडीच्या आजारांवर राज्यभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
हिंगोली (Pediatric Conference) : भारतीय बालरोग संघटना (IAP) शाखा हिंगोली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोलीच्या बालरोग विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २० जून २०२६ रोजी शहरातील हॉटेल शांती येथे राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञ परिषदेचे (Pediatric Conference) यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेत बालकांमधील गंभीर आजार तसेच आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीच्या व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
राज्यभरातील तज्ज्ञांची व्याख्याने
परिषदेचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या नामांकित बालरोगतज्ज्ञांची व्याख्याने. परिषदेत बालरोग उपचाराशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
यामध्ये लहान मुलांमधील अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत द्यावयाचे प्रथमोपचार, सर्पदंश व विंचूदंशानंतर तातडीने करावयाचे जीवरक्षक उपचार, बदलत्या वातावरणामुळे वाढत असलेल्या बालपणीच्या दमा (Asthma) या आजारावरील आधुनिक उपचार पद्धती तसेच लहान मुलांमध्ये येणाऱ्या आकडी (Fits/Seizures) या आजाराचे वेळेवर निदान आणि प्रभावी व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता. उपस्थित डॉक्टरांना या विषयांवर तांत्रिक आणि वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बालरोग संघटना (IAP) हिंगोली शाखेचे अध्यक्ष डॉ. दीपक नारायण मोरे होते. यावेळी संघटनेचे सचिव डॉ. गोपाल शंकरराव कदम आणि कोषाध्यक्ष डॉ. आशुतोष माहुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंगोली जिल्ह्यासह परिसरातील मोठ्या संख्येने बालरोगतज्ज्ञांनी परिषदेला उपस्थिती लावली.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
परिषदेत डॉ. परमानंद आनंद, डॉ. प्रवीण गोखले, डॉ. दयानंद नखाते, डॉ. कुंदन चोपडे, डॉ. बोराळकर, डॉ. महेश सुलक्षणे, डॉ. स्नेहल नगरे आणि डॉ. अण्णासाहेब लोखंडे यांनी विविध सत्रांमध्ये उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आधुनिक उपचार पद्धती, वैद्यकीय अनुभव आणि विविध क्लिनिकल परिस्थितींवरील उपाययोजनांची माहिती देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
आयोजकांचे परिश्रम
हा शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारतीय बालरोग संघटना (IAP) हिंगोली शाखा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या परिषदेमुळे हिंगोली व परिसरातील बालरोग उपचार सेवेचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.