Patur Panchayat Samiti: पातुर पंचायत समितीमध्ये पेव्हर ब्लॉक कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचे आरोप आहेत, ज्यामुळे निधी हडपण्याचा प्रकार सुरू आहे.
पातुर (Patur Panchayat Samiti) : पातुर पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. गावोगावी निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेव्हर ब्लॉकची कामे अंदाजपत्रकानुसार न करता अभियंते व ठेकेदार यांच्या संगनमताने कमी दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. कमी खर्चात काम पूर्ण करून जास्तीची बिले काढून निधी हडपण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप आहेत. या प्रक्रियेत मंजुरीपासून ते काम पूर्ण होईपर्यंत टक्केवारीचे व्यवहार होत असल्याचीही माहिती समोर येत आहे.
याच मुद्द्यावरून ३० मार्च रोजी पातुर पंचायत समिती (Patur Panchayat Samiti) कार्यालयात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामीण भागात झालेल्या पेव्हर ब्लॉक कामांची प्रत्यक्ष पाहणी करून तपास केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पंचायत समिती कार्यालय बनला आखाडा
पेव्हर ब्लॉक कामांबाबत आवाज उठवणाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोप आहेत. याच पार्श्वभूमीवर ३० मार्च रोजी (Patur Panchayat Samiti) पातुर पंचायत समिती कार्यालयात दोन गट आमनेसामने येत खडाजंगी झाली. या प्रकारामुळे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.