Parbhani E-Pharmacy: परभणी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी ई-फार्मसीच्या विरोधात 20 मे रोजी देशव्यापी बंदची तयारी केली आहे. यामध्ये ऑनलाइन औषध विक्री
परभणी जिल्ह्यात बंद यशस्वी करु: संजय मंत्री
परभणी (Parbhani E-Pharmacy) : ऑनलाईन औषध विक्री (ई-फार्मसी), मोठ्या कंपन्यांचे आक्रमक किंमत धोरण तसेच केंद्र सरकारच्या जीएसआर २२० (ई) व जीएसआर ८१७ (ई) अधिसूचना मागे घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा बंद जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व औषध विक्रेते एकजूट झाल्याची माहिती परभणी जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री व सचिव सूर्यकांत हाके यांनी दिली.
येथील औषधी भवन येथे शुक्रवार ८ मे रोजी झालेल्या बैठकीत या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट यांच्या वतीने यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सुमारे १२ लाख ४० हजार औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणार्या संघटनांच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. विशेषतः (Parbhani E-Pharmacy) ई-फार्मसीद्वारे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची पुरेशी पडताळणी न करता औषध विक्री होत असल्याने स्व-औषधोपचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिक नकळत स्वत:च्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
याशिवाय मोठ्या ई-फार्मसी कंपन्या (Parbhani E-Pharmacy) कमी दरात औषध विक्री करत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक लहान औषध विक्रेते आर्थिक संकटात सापडत असल्याचेही संघटनेने नमूद केले. जिल्ह्यातील सर्व केमिस्ट या आंदोलनात सहभागी होणार असून हा बंद १९ मेच्या मध्यरात्रीपासून २० मेच्या मध्यरात्रीपर्यंत पाळण्यात येणार असल्याची माहिती सचिव सूर्यकांत हाके यांनी दिली. बंदच्या काळात रुग्णांनी अत्यावश्यक सेवांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, तसेच आर.पी. मेडिकल कॉलेज, पाथरी रोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना होणार्या गैरसोयीबद्दल संघटनेने दिलगिरी व्यक्त केली आहे.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, मराठवाडा कोषाध्यक्ष अनिल हराळ, जिल्हा उपाध्यक्ष दत्तराव गाडगे, कोषाध्यक्ष पवन झांजरी, सहसचिव नारायण मुंदडा, जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गुंडाळे, कार्यकारिणी सदस्य बा.सु. टेंगसे, गोविंद शर्मा, गजानन दरगड, नंदू भरड, प्रवीण सिरस्कर, संदीप टाक, संदीप कोटलवार, कारभारी निरस, ज्ञानोबा वाघ, संजय नाईक, दिगंबर बाकळे, डॉ. अजय ठाकूर, नितीन चिद्र्वार, शाहिद अन्सारी यांच्यासह अनेक औषध विक्रेते उपस्थित होते.
‘शासन मोठ्या ऑनलाइन कंपन्यांसमोर झुकले’: सूर्यकांत हाके
‘ग्रामीण भागात औषध विक्रेते दिवस-रात्र रुग्णसेवा देत असताना शासन मात्र मोठ्या ऑनलाईन कंपन्यांना पाठीशी घालत आहे. ई-फार्मसीच्या नावाखाली औषध विक्रीचा बाजार मोकळा करून पारंपरिक औषध विक्रेत्यांना संपवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीची पडताळणी न करता औषधे विकली जात असतील तर उद्या त्याचे गंभीर परिणाम जनतेलाच भोगावे लागतील. शासनाने तातडीने हे धोरण मागे घेतले नाही तर केवळ एक दिवसाचा बंद नव्हे, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला.