Parbhani ST Bus Fire: परभणीत मानवत बायपास रोडवर एसटी बसला आग लागली, परंतु चालक आणि वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ४३ प्रवाशांचे प्राण वाचले.
चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ४३ प्रवाशांचे प्राण वाचले
परभणी (Parbhani ST Bus Fire) : मानवत शहरातील बायपास रोडवरील संत सावता माळी चौका जवळ सोमवार ११ मे रोजी दुपारी ३ वाजता परभणीहून बिडकडे जाणार्या एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील तब्बल ४३ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात यश आले. वेळेत आग विझवण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.
परभणीहून बिडकडे जाणारी एमएच १३ सीयू ७८२८ या क्रमांकाची एसटी बस (Parbhani ST Bus Fire) मानवत शहरातील संत सावता माळी चौकात आली असता बसच्या खालच्या भागातून धूर आणि आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. याचवेळी मागून येणार्या एका ट्रक चालकाने बसला आग लागल्याची माहिती गायकवाड या बस चालकाला दिली. त्यामुळे समय-सूचकता दाखवत चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर चालक जी. ए. गायकवाड आणि वाहक सय्यद इम्रान यांनी प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्वच्या सर्व ४३ प्रवाशांना तातडीने खाली उतरवले.
काही क्षणांतच बसच्या खालच्या भागातून धूर वाढू लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता, मात्र चालक आणि वाहक यांनी धाडसाने आग विझवण्याचा प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या (Parbhani ST Bus Fire) बसमधून मानवत, पाथरी, तेलगाव आणि बीड जिल्ह्यातील प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवाशांना दुसर्या एसटी बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.