स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी निश्चित करण्यात आली होती.
परभणी (Parbhani Municipal Corporation) : परभणी शहर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोमवार (२९ जून) रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून अंबिका डहाळे, तर काँग्रेसकडून विनोद कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी निश्चित करण्यात आली होती. विहित मुदतीत दोन्ही उमेदवारांचे अर्ज महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाले.
परभणी महानगरपालिकेच्या सभागृहात एकूण ६५ नगरसेवक असून, त्याशिवाय ६ स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाते. या जागांपैकी शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला दोन, तर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शहर विकास आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे.
यापूर्वी भाजपकडून शिवाजी भरोसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून शेख फहाद शालिमार आणि शहर विकास आघाडीकडून राहुल मुरकूटे यांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी शिवसेना (उबाठा) गटाकडून अंबिका डहाळे यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, मनपा गटनेते दिलीप ठाकूर, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजू लाला, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, विकास राजापुरे, अनिल डहाळे, बाळराजे तळेकर आणि नवनित पाचपोर उपस्थित होते.
काँग्रेसकडून विनोद कदम यांनी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेसचे गटनेते गुलमीर खान उपस्थित होते.
येत्या सर्वसाधारण सभेत या नावांना मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले नव्हते.