Parbhani Youth Death: पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारात शेतातील तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार २७ जून रोजी सकाळी घडली.
वीजवाहिनी दुरुस्त करताना झाला अपघात वाघाळा शिवारातील घटना
परभणी (Parbhani Youth Death) : पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारात शेतातील तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार २७ जून रोजी सकाळी घडली.
अतुल रमेश काळे (वय २८, रा. चाटे पिंपळगाव, ता. पाथरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अतुल काळे हे शनिवार २७ जून रोजी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान वाघाळा शिवारातील त्यांच्या शेतात गेले होते. यावेळी शेतातील कृषी पंपाला वीजपुरवठा करणार्या विद्युत वाहिनीतील एक तार तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदरील तार दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असताना त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला.
या (Parbhani Youth Death) घटनेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शेजारील शेतकर्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांना तसेच पाथरी पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस हवालदार बालाजी लटपटे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची माहिती कळल्यानंतर वाघाळा व पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती . दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बालाजी लटपटे करीत आहेत.