Palgaon Bus Stop: औद्योगिक परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदा बिबी आवाळपूर पालगाव आणि परिसरातील गावांसाठी जीवनवाहिनी समजली जाणारी 'एसटी' सेवा कोरोना काळापासून पूर्णपणे विस्कळीत झाली
पालगाव वरून सुटणाऱ्या सर्व बसेस पूर्वरत सुरु करण्याची मागणी
कोरपना (Palgaon Bus Stop) : औद्योगिक परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदा बिबी आवाळपूर पालगाव आणि परिसरातील गावांसाठी जीवनवाहिनी समजली जाणारी 'एसटी' सेवा कोरोना काळापासून पूर्णपणे विस्कळीत झाली असून, अनेक महत्त्वाच्या बसफेऱ्या अचानक बंद करण्यात आल्या आहेत. यात पालगाव -आर्वी, पालगाव सावनेर, पालगाव-नागपूर, पालगाव-साकोली, पालगाव-अहेरी अशा प्रमुख बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने याचा थेट फटका ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि वृद्ध प्रवाशांना बसत असून त्यांचे अतोनात हाल होत असून थेट बस पकडन्याकरिता राजुरा किव्हा चंद्रपूरातून बसेस पकडाव्या लागत आहे मात्र, या गंभीर समस्येकडे संबंधित राजुरा आगार प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.
पालगाव येथून विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेस अचानक बंद (Palgaon Bus Stop) करण्यात आल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा किंवा अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
खाजगी वाहनाना अच्छे दिन अवैध वाहतुकीला ऊत
एसटी बसेस वेळेवर धावत नसल्याचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स व वाहनधारकांकडून घेतला जात आहे. (Palgaon Bus Stop) प्रवाशांची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात आहे. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
या संदर्भात ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून बसफेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. "एसटी ही सर्वसामान्यांची वाहिनी आहे, तीच बंद झाल्याने ग्रामीण भागाचे जनजीवन कोलमडले आहे," अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या आहेत. जर येत्या आठवड्या भऱ्यात पालगाव वरून सुटणाऱ्या सर्व प्रमुख बसफेऱ्या नियमित सुरू न झाल्यास, प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालगाव व औद्योगिक परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.