गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात एका २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.
माहेरी जाण्याच्या आदल्याच दिवशी नवविवाहितेची आत्महत्या; पाच जणांवर गुन्हा दाखल
बीड (Newlywed Woman Suicide) : गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात एका २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित कुटुंबीय फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृत विवाहितेचे नाव पूजा प्रमोद सुरवसे (वय २१) असे असून, ती गेवराई शहरातील गजानन नगर येथे पती व सासरच्या कुटुंबीयांसह राहत होती. मंगळवारी (दि. २ जून) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास तिने घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परभणी जिल्ह्यातील तिच्या माहेरची मंडळी मोठ्या संख्येने गेवराई येथे दाखल झाली. त्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून त्यामागे सासरच्या मंडळींकडून होणारा छळ व अन्य कारणे असू शकतात, असा आरोप केला. संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही तसेच शवविच्छेदनासही संमती देणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली.
यामुळे उपजिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत त्यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा सासरच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित कुटुंबीयांनी घर सोडून पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह माहेरच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह परभणी येथे नेण्यात आला असून तेथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पूजा हिचा विवाह गेल्या वर्षी गेवराई येथील प्रमोद सुरवसे यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. संसाराची अनेक स्वप्ने उराशी बाळगून नवजीवनाची सुरुवात केलेल्या या तरुणीचा अवघ्या एका वर्षात झालेला दुर्दैवी अंत सर्वांनाच हळहळ लावून गेला आहे.
विशेष म्हणजे, बुधवारी या दाम्पत्याचा लग्नानंतरचा पहिला धोंड्याचा महिना असल्याने दोघेही परभणी येथे माहेरी जेवणासाठी जाणार होते. मात्र, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण काय आणि नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.