NEET copy racket: सध्या सुरू असलेल्या 'नीट' पेपरफुटीच्या सीबीआय चौकशीची व्याप्ती वाढवून, जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांवर चालणाऱ्या 'कॉपी रॅकेट'चीही सखोल चौकशी करण्यात यावी
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शशिकांत पा क्षीरसागर यांची मागणी
नांदेड (NEET copy racket) : सध्या सुरू असलेल्या 'नीट' पेपरफुटीच्या सीबीआय चौकशीची व्याप्ती वाढवून, जिल्ह्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांवर चालणाऱ्या 'कॉपी रॅकेट'चीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नांदेड महानगर अध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सीबीआयच्या नवी दिल्ली येथील संचालकांकडे तक्रार केली असून, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
भाजयुमोने सीबीआयला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी नीट प्रकरणातील सीबीआयची कारवाई स्वागतार्ह आहे. मात्र, नांदेड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील कॉपीच्या गैरप्रकारांचीही पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे. २०२५ मध्ये कॉपी मुक्त अभियानांतर्गत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन अनेक केंद्रांवर खुलेआम सुरू असलेला कॉपीचा प्रकार रंगेहात पकडला होता. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती.
असे असतानाही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक दोषी संस्थांवर पुढे कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा गंभीर आरोप या (NEET copy racket) पत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याच्या प्रस्तावातून अशा अनेक दोषी केंद्रांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले. कॉपीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यामध्ये अनेक शैक्षणिक संस्थाचालक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांचे मोठे साटेलोटे असून, यातून प्रचंड अवैध कमाई केली जात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.
या गंभीर पार्श्वभूमीवर केवळ (NEET copy racket) नीट परीक्षाच नव्हे, तर दहावी-बारावीच्या परीक्षांमधील कॉपी रॅकेट आणि त्यामागील कोट्यवधींच्या आर्थिक भ्रष्टाचाराचीही सीबीआयमार्फत सखोल चौकशी व्हावी. तसेच, दोषींवर कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्राला लागलेला हा कलंक कायमचा दूर करावा, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. नीट प्रकरणाच्या निमित्ताने आता दहावी-बारावीच्या परीक्षांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.यावेळी भाजपा युवा मोर्चा चे करण चव्हाण,प्रियेश ठाकूर,शिवा लोट, शुभम खोडके,अध्ययन तेहरा, शुभम महाजन यांची उपस्थिती होती.