मलकापूर (Malkapur Tree Dindi) : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे वृक्ष लागवड, संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान’ आणि ‘भातृ मंडळ, मलकापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवले जाणार आहेत.
वृक्ष दिंडी सोहळा
स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान येथून भव्य ‘वृक्ष दिंडी सोहळ्या’स सुरुवात होईल. या दिंडीचा सांगता/समारोप सायंकाळी ६:०० वाजता भ्रातृ मंडळ, मलकापूर येथे होणार आहे.
‘जागर राष्ट्रभक्तीचा’ संगीतमय कार्यक्रम
दिंडीच्या समारोपानंतर सायंकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित गीतांचा हा कार्यक्रम ‘स्वरमाला मेलोडीज, अकोला’ हे कलाकार सादर करतील.
प्रमुख पाहुणे व उपस्थिती
या सोहळ्याचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. प्रविणकुमार देवरे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. निलेशजी तांबे (IPS) भूषवणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना तालुक्यातील सर्व पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र, देशप्रेमी नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि भातृ मंडळ, मलकापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.