नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांचा अंतिम युक्तिवाद; सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची न्यायालयाकडे मागणी
पुणे (Nasrapur Case) : नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात तांत्रिक, वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीविरोधातील दोषारोप ठामपणे मांडले. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा बचाव खोटा ठरत असल्याचे सांगत त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. या प्रकरणाचा निकाल येत्या २५ जून रोजी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरू आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी अंतिम युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयातील संबंधित निर्णयांचाही संदर्भ न्यायालयासमोर मांडला.
सरकार पक्षाच्या मांडणीनुसार, आरोपी भीमराव कांबळे याने दुपारी ३.१२ वाजता पीडितेला घटनास्थळाकडे नेले आणि ३.५१ वाजता तो एकटाच तेथून परतताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या तांत्रिक पुराव्यांवरून पीडिता सुमारे ३९ मिनिटे आरोपीच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या कालावधीत तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा सरकार पक्षाने केला.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने तपास यंत्रणेने संकलित केलेल्या सहा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर उलगडला. तसेच शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय दाखले आणि पीडितेच्या शरीरावरील जखमांचे विश्लेषण सादर करून उपलब्ध पुरावे एकमेकांना पूरक असल्याचे मांडण्यात आले.
विशेष सरकारी वकिलांनी डीएनए प्रोफाइलिंगसह वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग निर्विवादपणे सिद्ध होत असल्याचा दावा केला. घटनेनंतर आरोपीच्या संशयास्पद हालचाली तसेच पूर्वीच्या खटल्यांमुळे असलेल्या कायदेशीर ज्ञानाचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
सरकार पक्षाने न्यायालयासमोर मांडलेले प्रमुख पुरावे :
- आरोपीने घटनास्थळाची पूर्वरेकी केल्याचा दावा.
- मुख्य साक्षीदार आणि बालसाक्षीदारांचे जबाब सरकार पक्षाच्या मते महत्त्वाचे.
- घटनास्थळ पंचनामा आणि आरोपीची ओळख परेड यांमधून गुन्ह्याची साखळी स्पष्ट होत असल्याचा दावा.
- जप्त केलेल्या पुराव्यांमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नसल्याचे सरकार पक्षाचे म्हणणे.