अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मानोरा : माय भारत, वाशिम (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. व्यसनमुक्तीबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या स्पर्धांमध्ये लोकगीत (सामूहिक), सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, शॉर्ट फिल्म/रिल, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता) तसेच भाषण स्पर्धेचा समावेश करण्यात आला होता. सर्व स्पर्धा ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर आधारित होत्या. व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषा, कला आणि भूमिका साकारून आपली सादरीकरणे केली.
या स्पर्धांचे आयोजन दि. २८ जुलै २०२६ रोजी राजस्थान महाविद्यालय, वाशिम येथे करण्यात आले होते.



कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी महोदयांचे प्रतिनिधी विठ्ठल भुसारे, शिक्षण अधिकारी (प्रा.), कैलास घुमरे, सेवानिवृत्त अधिकारी, प्रा. डॉ. ओमप्रकाश झंवर, प्राचार्य, राजस्थान महाविद्यालय, शाहू भगत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मयूरकुमार गोमरे, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत केंद्र वाशिम, प्रा. डॉ. किशोर एम. इंगोले, सहप्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय हिंगोली, कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे, माय भारत केंद्र वाशिम आणि वाशिम जिल्हा युवा आयडॉल प्रदीप पट्टेबहादुर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी जिल्हास्तरीय ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी संघ व स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवली.
यामध्ये ‘नशामुक्त युवा’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था, केकतउमरा यांच्यातर्फे सहभागी झालेले ऋषिकेश विष्णू चौधरी, रा. पारवा, मानोरा यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
मान्यवरांच्या हस्ते ऋषिकेश चौधरी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूरकुमार गोमरे यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार अनिल ढेंगे यांनी मानले. या कार्यक्रमाला युवक, युवती आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग लाभला.