श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील भाविकांच्या गैरसोयी दूर न केल्यास १३ मे २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.
हिंगोली (Narsi Namdev News) : श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे भाविकांना होणाऱ्या गैरसोयी तात्काळ दूर कराव्यात, अन्यथा 13 मे 2026 रोजी एकादशीच्या दिवशी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित प्रशासनाला दिला आहे.
संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या या पवित्र क्षेत्रात महाराष्ट्रासह पंजाबसारख्या इतर राज्यांतून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तीव्र उन्हामध्ये दर्शन रांगेत उभ्या भाविकांसाठी कोणत्याही प्रकारचे मंडप किंवा शेड उपलब्ध नाहीत. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची पुरेशी व्यवस्था नसून पार्किंग आणि दर्शन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. यामुळे वृद्ध, महिला आणि सर्वसामान्य भाविकांची मोठी हेळसांड होत आहे. ही बाब संत नामदेव महाराजांच्या पवित्र भूमीला शोभणारी नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर संघटनेचे श्री. गजानन प्रकाश कावरखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी, 2 मे रोजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव तसेच नर्सी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे यांना निवेदन सादर केले. या निवेदनावर श्री. गजानन प्रकाश कावरखे, मारोती श्रीराम लांबुटे, राहुल पूरभू जाधव, दशरथ गजानन मुरके, मनोहर भगवान पाटील, मनोज शावल चव्हाण, गणेश रामभाऊ भोईटे व इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
निवेदनाद्वारे दर्शन रांगेत तात्काळ मंडप उभारणे, पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था करणे आणि शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानाप्रमाणे शिस्तबद्ध व सुलभ दर्शन व्यवस्था राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. जर लवकरात लवकर योग्य उपाययोजना झाल्या नाहीत, तर 13 मे 2026 रोजी नामदेव महाराजांची पालखी घेऊन रस्त्यावर बसून व डोळ्यावर पट्टी बांधून लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.