Nangara Virasat Museum: बहुजन बांधवांची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे देशभरातून येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या सामान्य भाविक भक्तांची भावना लक्षात घेऊन नंगारा विरासत म्युझियम संग्रहालय दर १०० रुपये
आंदोलनस्थळी १०० रुपये तिकीट झालीच पाहिजेचा नारा!
तिकीट घराला ठोकले कुलूप!
मानोरा (Nangara Virasat Museum) : बहुजन बांधवांची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे देशभरातून येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या सामान्य भाविक भक्तांची भावना लक्षात घेऊन नंगारा विरासत म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी १०० रुपये तिकीट दर निश्चित करावे, या मागणीसाठी दि. ४ ऑगस्ट रोजी मंगळवारला धर्मगुरु जितेंद्र महाराज आणि धर्मगुरु कबिरदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये नंगारा विरासत भवन प्रवेशद्वारासमोर ताला ठोको आंदोलनाला सुरूवात झाली. तब्बल दीड तास आंदोलन सुरू असुनही कोणत्याही प्रकारचे आश्वासन न मिळाल्याने धर्मगुरूंनी तिकीट घराला कुलूप लावून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला.
तीर्थक्षेत्र काशी पोहरादेवी संत नगरीत येणारा भाविक भक्त हा गरीब शेतमजूर असल्याने (Nangara Virasat Museum) नंगारा विरासत म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी २०० रुपये तिकीट हे न परवडणारे आहे. त्यामुळे २०० रुपये तिकिटावरून १०० रुपये करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सहनियंत्रण समितीचे अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहाराने पाठपुरावा करूनही भाविकांची थट्टा केली जात आहे. याआधी तिकीट दर १०० रुपये व्हावा यासाठी २५ जुलै २०२६ रोजी नंगारा विरासत म्युझियम संग्रहालयाला शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये ताला ठोकण्याच्या इशाऱ्यांचे आंदोलन धर्मगुरू जितेंद्र महाराज आणि धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी दिले होते.

परंतु गुरुपौर्णिमा निमित्त ३ दिवस तिकीट दर १०० रुपये करण्याचा आदेश सबंधित अल्फा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन ३० जुलै २०२६ रोजी यासंदर्भात निर्णय घेण्याचा ठरविले होते. परंतु प्रत्यक्षात कुठलाही निर्णय न झाल्याने पुन्हा ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्याअनुषंगाने मंगळवारी ( दि. ४ ) रोजी दुपारी १२ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. तिकीट दर १०० रुपये झालेच पाहिजे असा नारा आंदोलकांनी देत परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात भाविक भक्त महीला पुरुष सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्या संदर्भात आंदोलकांची समजूत काढली पण त्यांनी नकार दिला. व तिकीट घराला कुलूप लावून नंगारा वास्तू म्युझियम बंद पाडला. आंदोलनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
संतनगरी काशी पोहरादेवीत येणारा भाविक भक्त गरीब वर्ग आहे. त्यामुळे नंगारा विरासत म्युझियम संग्रहालय पाहण्यासाठी २०० रुपये त्यांना परवडत नाही. यासाठी १०० रुपये तिकीट दर आकारणी करावी याबाबत वारंवार देखरेख समितीला विनंती करण्यात आली. मात्र शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ताला ठोको आंदोलन करण्यात आले आहे. संबंधितांनी याबाबत दखल घेतली नाही, तर येत्या काही दिवसांत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
-धर्मगुरु जितेंद्र महाराज, गोरबंजारा धर्मपीठ भक्तिधाम पोहरादेवी
बंजारा विरासत नंगारा म्युझियम संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आम्ही भाविकांची मागणी घेऊन वास्तू पाहण्यासाठी १०० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात यावे, अशी मागणी करूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन सुरूच राहील.
-धर्मगुरु कबिरदास महाराज, पुजारी संत सेवालाल महाराज मंदीर संस्थान