चाकूर तालुक्यातील नळेगाव–उदगीर महामार्गावरील अजनसोंडा पाटीजवळील धोकादायक वळणाने सोमवारी पुन्हा एकाचा बळी घेतला.
लातूरहून उदगीरकडे जाणारा मालवाहू टेम्पो उलटला; चालकाचा मृत्यू, कायमस्वरूपी उपाययोजनांची जोरदार मागणी
चाकूर तालुक्यातील नळेगाव–उदगीर महामार्गावरील अजनसोंडा पाटीजवळील धोकादायक वळणाने सोमवारी पुन्हा एकाचा बळी घेतला. लातूरहून उदगीरकडे जाणारा मालवाहू ४०७ टेम्पो वळणावर उलटल्याने चालक संजय गुरुनाथ राठोड (वय ४०, रा. सोमनाथपूर तांडा, ता. उदगीर) यांचा टेम्पोखाली दबून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेनंतर या वळणावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या वळणावर वारंवार अपघात होऊन अनेकांनी प्राण गमावले आहेत. धोकादायक रचना, रस्त्याची झीज, अपुरे इशारा फलक, भरधाव वाहतूक आणि वळणालगतचा खोल खड्डा यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. समोरच विद्यार्थी व ग्रामस्थ बसची प्रतीक्षा करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी रस्ता सुरक्षा तपासणी करून वळणाची रचना सुधारावी. दोन्ही बाजूंना गतिरोधक, वेग कमी करणारे पट्टे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, धोक्याचे इशारा फलक, संरक्षण कठडे आणि प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अपघातानंतर केवळ पंचनामा करण्याऐवजी कारणे दूर करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.


अजनसोंडा गावकरीच धावतात मदतीला; दोन्ही बाजूंना गतिरोधक उभारल्याशिवाय अपघात थांबणार नाहीत
"अजनसोंडा पाटीजवळील या धोकादायक वळणावर अपघात झाला की सर्वप्रथम आमच्या गावातील नागरिकच मदतीसाठी धाव घेतात. अनेक वेळा दोरखंड, ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनांमधून जखमी आणि मृतांना बाहेर काढावे लागते. या वळणाने अनेकांचे प्राण घेतले आहेत, तरीही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना झालेल्या नाहीत. या ठिकाणी दोन्ही बाजूंना गतिरोधक (ब्रेकर), वेग कमी करणारे पट्टे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, परावर्तित सूचना फलक आणि संरक्षण कठडे तातडीने उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणात येईल आणि वारंवार होणाऱ्या अपघातांवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल. प्रशासनाने आणखी जीवितहानी होण्याची वाट न पाहता तातडीने कार्यवाही करावी," अशी मागणी अजनसोंडा येथील नागरिक सुखदेव पाटील यांनी देशोन्नतीशी बोलताना केली.