मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालये व कार्यालयांमध्ये स्वच्छतेसाठी नवे नियम; सुरक्षा रक्षकांकडून तपासणी, गुटखा-तंबाखू जप्ती आणि दंडात्मक कारवाईची तरतूद
मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये गुटखा, तंबाखू किंवा पान खाऊन येणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयाचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी होणारी अस्वच्छता रोखणे आणि आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ वातावरण कायम ठेवणे हा आहे.
महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी यासंदर्भात महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली होती. या सूचनेत गुटखा, तंबाखू आणि पानाचे सेवन करून येणाऱ्या नागरिकांना महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालये, रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने या प्रस्तावाचा विचार करून आवश्यक नियम तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
प्रस्तावित नियमांनुसार, महापालिकेच्या रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवर तैनात असलेले सुरक्षा रक्षक रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची तपासणी करतील. एखाद्या व्यक्तीने गुटखा किंवा तंबाखूचे सेवन केल्याचे निदर्शनास आल्यास त्याला रुग्णालयात प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तसेच संबंधित व्यक्तीकडे गुटखा किंवा तंबाखू आढळल्यास तो जप्त करण्याचीही तरतूद करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तयार होणाऱ्या नियमावलीमध्ये केवळ प्रवेशबंदीच नव्हे, तर दंडात्मक कारवाईचाही समावेश असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करणाऱ्यांकडून संबंधित परिसर स्वच्छ करून घेण्याची तरतूदही या नियमांमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे.
रुग्णालयांचा परिसर, महापालिकेची कार्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व शिस्तबद्ध ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार असून, नवीन नियमांची अंमलबजावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.