Parbhani Bike-Tipper Accident: परभणी तालुक्यातील ताडकळस टीपॉईंटवर दुचाकी आणि टिपरच्या भीषण अपघातात एक तरुण मृत आणि त्याचे वडील गंभीर जखमी झाले. घटनेमुळे
दुचाकीवरील मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी...!
परभणी/ पूर्णा (Parbhani Bike-Tipper Accident) : पूर्णा तालुक्यातील ताडकळस टीपॉईंट परिसरात मंगळवारी सकाळी दुचाकी आणि भरधाव टिपरमध्ये भीषण अपघात होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मो. सिद्दीक जिलानी (वय २१) हा आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून पूर्णा शहरातून ताडकळसकडे जात होता. दरम्यान, ताडकळस टीपॉईंट येथे भरधाव वेगाने येणाऱ्या टिपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मो. सिद्दीक याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील रौफ जिलानी (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून संबंधित टिपर ताब्यात घेतला आहे. (Parbhani Bike-Tipper Accident) घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ताडकळस टीपॉईंट परिसरात भरधाव वाहनांमुळे वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक व पोलिस बंदोबस्ताची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.