मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ टर्मिनलवर एका प्रवाशाच्या वक्तव्यामुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली.
टी-२ टर्मिनलवरील दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या बोर्डिंग गेटवर प्रकार; सहार पोलिसांकडून चौकशी सुरू
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ टर्मिनलवर एका प्रवाशाच्या वक्तव्यामुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. दिल्लीला रवाना होणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या बोर्डिंग गेटवर सुरक्षा तपासणी सुरू असताना संबंधित प्रवाशाने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. या वक्तव्यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था तातडीने सतर्क करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई केली. उड्डाण होण्यापूर्वीच संबंधित प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) त्याला ताब्यात घेतले.
या प्रकारामुळे विमानतळाच्या टी-२ टर्मिनल परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा यंत्रणांकडून संबंधित प्रवाशाची चौकशी करण्यात येत असून, या वक्तव्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी सहार पोलिसांकडूनही प्रवाशाची चौकशी सुरू आहे. विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.