Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बस प्रवासासाठी स्मार्ट कार्ड सवलतीकडे प्रवाशांचा कल; जिल्ह्यात ४८ हजार जणांची नोंदणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) विविध सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अर्थात स्मार्ट कार्डची नोंदणी जिल्ह्यात वेगाने सुरू आहे.


बस प्रवासासाठी स्मार्ट कार्ड सवलतीकडे प्रवाशांचा कल जिल्ह्यात ४८ हजार जणांची नोंदणी

MSRTC Smart Card |

हिंगोली, कळमनुरी आणि वसमत आगारांत एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

हिंगोली (MSRTC Smart Card) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) विविध सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अर्थात स्मार्ट कार्डची नोंदणी जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीन बस आगारांमधून आतापर्यंत सुमारे ४८ हजार प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे.

हिंगोली जिल्ह्याचा परिवहन कारभार परभणी विभागामार्फत चालविला जात असून फेब्रुवारी २०२६ पासून स्मार्ट कार्ड नोंदणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. हिंगोली आगारातून २८ हजार, तर वसमत आणि कळमनुरी आगारातून प्रत्येकी १० हजार प्रवाशांची नोंदणी झाली आहे.

हिंगोली येथील वाहतूक निरीक्षक एफ. एम. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरूच राहणार असून योजना बंद करण्यात येणार नाही. नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात १३ खासगी एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे.

चार हजार कार्डांचे वितरण

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार हजार स्मार्ट कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये हिंगोली आगारातून दोन हजार, तर वसमत आणि कळमनुरी आगारातून प्रत्येकी ५०० कार्डे वितरित करण्यात आली आहेत. उर्वरित कार्डधारकांना लवकरच कार्डांचे वितरण करण्यात येणार असून सध्या सुमारे ७० टक्के कार्डे वितरित होणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली.

१ ऑगस्टपासून स्मार्ट कार्डला प्राधान्य

सध्या आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आदी ओळखपत्रांच्या आधारे प्रवाशांना विविध सवलती दिल्या जात आहेत. मात्र भविष्यात सवलतींची प्रक्रिया पूर्णपणे स्मार्ट कार्डशी जोडली जाणार आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर सवलतधारकांनी स्मार्ट कार्ड काढून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा लाभ

महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व वयोगटातील महिलांना ५० टक्के प्रवास सवलत मिळत आहे. तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध आहे.

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत सुमारे ४,८०० नागरिकांनी प्रवास सवलतीचा लाभ घेतला असून महिला सन्मान योजनेत ३,८०० महिलांनी सवलतीच्या दरात प्रवास केला आहे.

स्मार्ट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

स्मार्ट कार्डसाठी आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी शालार्थ आयडी, सरल क्रमांकाशी संलग्न माहिती, शैक्षणिक ओळखपत्र आणि बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी कार्ड, तर पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि इतर सवलतधारकांसाठी संबंधित कागदपत्रांची आवश्यकता आहे.

नवीन स्मार्ट कार्डसाठी जीएसटीसह १९९ रुपये शुल्क आकारले जाते. जुने कार्ड जमा केल्यास नवीन कार्ड १४९ रुपयांत उपलब्ध आहे. तसेच कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक असून रिचार्ज ५० रुपयांच्या पटीत करावे लागते.

स्मार्ट कार्डचे फायदे

एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे रोख रकमेची गरज कमी होणार असून तिकीट प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक व्यवहार आणि एकाच कार्डद्वारे देशभरातील बस, मेट्रो आणि लोकल सेवांमध्ये प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे वाहतूक निरीक्षक एफ. एम. शेख यांनी सांगितले.

Related to this topic: