महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण हिंगोली जिल्ह्यातही सुरू करण्यात आले आहे.
हिंगोली (MSRTC NCMC Smart Card) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण हिंगोली जिल्ह्यातही सुरू करण्यात आले आहे. हिंगोली आगारासह कळमनुरी, वसमत व सेनगाव बसस्थानकांवर तसेच जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांकडे ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, हिंगोली जिल्ह्यातही अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच हिंगोली जिल्ह्यातील सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, एनसीएमसी कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. हिंगोली आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या उपक्रमामुळे हिंगोली जिल्ह्यातील एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.