शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने चिखली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
चिखली : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने चिखली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चिखली शहर व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला 'एमपीडीए' (MPDA) कायद्यान्वये एक वर्षासाठी बुलडाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच, इतर दोघा उपद्रवी व्यक्तींना तीन महिन्यांसाठी संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.




सराईत गुन्हेगारावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई
चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी स्वप्निल उर्फ संपत गजानन काकफळे (वय २५ वर्ष) याच्याविरुद्ध 'एमपीडीए' (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बुलडाणा यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. १८ जुलै २०२६ रोजी स्वप्निल काकफळे याला एक वर्षासाठी बुलडाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

गुन्ह्यांची पार्श्वभूमी
स्वप्निल काकफळे याच्याविरुद्ध दुखापत करणे, जीवघेणा हल्ला, चोरी, रात्रीच्या वेळी संशयास्पदरीत्या फिरणे, गांजा सेवन करून सार्वजनिक शांतता भंग करणे, जुगार खेळविणे तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरीचा प्रयत्न करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या धोकादायक वर्तनामुळे चिखली शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन आरोपी बुलडाणा जिल्ह्यातून तडीपार
या कारवाईसोबतच पोलिसांनी शहरातील इतर दोन उपद्रवी घटकांवरही कठोर पाऊल उचलले आहे. साहिल राजेंद्र शिंगणे व अनिकेत शाम श्रीमंत या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ नुसार तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार या दोघांनाही तीन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे व माननीय अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, पोलीस अंमलदार अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बुलडाणा येथील संजय भुजबळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, "शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. भविष्यातही सराईत गुन्हेगार, दहशत माजवणारे आणि समाजकंटकांविरुद्ध अशीच कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील."