नागपूरमध्ये नोकरीच्या आमिषाने एका तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
नागपूर (Molestation Case) : नागपूरमध्ये नोकरीच्या आमिषाने एका तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घाट रोडवरील ‘सिल्व्हर नेस्ट’ हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून संबंधित आरोपी हा एका कार शोरूमचा मालक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला नोकरी संदर्भात चर्चा करण्यासाठी भेटण्याचे सांगत हॉटेलमध्ये बोलावले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने तरुणीने दोन मैत्रिणींना सोबत घेतले. तिघी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आरोपी त्यांना थेट एका खोलीत घेऊन गेला. मात्र, काही वेळातच त्याने पीडितेशी अयोग्य वर्तन करण्यास सुरुवात केली आणि जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेच्या मैत्रिणींनी आरोपीला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. अखेर पीडितेने आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून तातडीने मदत मागितली. त्याचबरोबर ‘डायल 112’ वर कॉल करून पोलिसांनाही माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने हॉटेलमध्ये दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, पीडित तरुणीने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, इतक्या गंभीर प्रकारानंतरही आरोपीवर सौम्य कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला सहज जामीन मिळू शकतो. यामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळण्याची भीतीही तिने व्यक्त केली आहे.
दरम्यान, गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे नागपूरमध्ये नोकरीच्या नावाखाली महिलांना फसवण्याच्या प्रकारांविषयी चिंता वाढली आहे. विशेषतः तरुणींनी अशा ऑफर्सबाबत सावध राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.