वायफड बसथांबा ते पारधी बेडा परिसरात दारूबंदी मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर जमावाने हल्ला करून दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली.
वर्धा : वायफड बसथांबा ते पारधी बेडा परिसरात दारूबंदी मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर जमावाने हल्ला करून दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, एका आरोपीने सत्तूरने वार करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात आठ नामनिर्देशित आरोपींसह ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलगाव उपविभागात दारूबंदीची विशेष मोहीम सुरू आहे. ११ जुलै रोजी विशेष पथक वायफड परिसरात कारवाईसाठी गेले असता, बसस्थानकाजवळ गावठी दारूची वाहतूक करताना अंजित नामक व्यक्ती व त्याच्या पत्नीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. पंचनामा सुरू असताना अंजितच्या पत्नीने मोबाईलवरून काहींना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर ३० ते ४० महिला-पुरुषांनी पोलिसांना घेराव घालत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या गोंधळात अंजित व त्याची पत्नी तेथून पसार झाले.
वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पुलगाव पोलिसांचे अतिरिक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेत असताना पारधी बेडा चौकात काही व्यक्ती लोखंडी रॉडचे तुकडे करत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी सौरभ भोसले, चरणसिंग भोसले, मुकेश भोसले, परमजित भोसले, प्रशांत भोसले, सुनिल चव्हाण याची बहीण तसेच इतर ५० ते ६० जणांनी पोलिसांवर हल्ला चढवत दगडफेक केली.
या हल्ल्यात पोलिस अधिकारी मल्हारी ताळीकोटे तसेच कर्मचारी मधुकर सामलवार आणि सोनी नगराळे जखमी झाले. एका आरोपीने सत्तूरने वार करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस निरीक्षक ढाकणे यांच्या दिशेनेही सत्तूर फेकण्यात आला. मात्र, ते थोडक्यात बचावले.
या प्रकरणी अंजित, त्याची पत्नी, प्रशांत भोसले, सौरभ भोसले, चरणसिंग भोसले, मुकेश भोसले, परमजित भोसले, सुनिल चव्हाण याची बहीण व इतर ५० ते ६० जणांविरुद्ध पुलगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.