मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाशी संबंधित एक धक्कादायक रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई (Missing Link Viral Video) : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाशी संबंधित एक धक्कादायक रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि संबंधित कंत्राटदारांच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंक प्रकल्पातील सुमारे १८० फूट उंच पुलावर किरकोळ काम सुरू असताना एका कामगाराने क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बसून रील शूट केली. या ट्रॉलीमध्ये ४ ते ५ कामगार असल्याचे दिसून येते. पुलाच्या अगदी टोकावर ही ट्रॉली असल्याने खाली शेकडो वाहने वेगाने धावत असतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसते. अशा धोकादायक परिस्थितीतही संबंधित कामगार रील बनवण्यात व्यस्त असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
या प्रकारामुळे संभाव्य धोका किती मोठा असू शकतो, याची जाणीव होते. जर रील बनवताना क्षणिक दुर्लक्ष झाले असते आणि ट्रॉली कोसळली असती, तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती. पुलाखाली खोल दरी असल्याने हा प्रकार अधिकच गंभीर मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर MSRDC आणि कंत्राटदार कंपनीच्या देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, या पुलावर वाहनचालकांनी फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी थांबले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. महामार्ग पोलिसांची ही भूमिका सुरक्षेच्या दृष्टीने योग्य मानली जाते. मात्र, दुसरीकडे कामगारांकडून असे जीवघेणे कृत्य होत असताना प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, १०.५ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. अत्यंत प्रतिकूल हवामान, वेगवान वारे आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे घाटातील धोकादायक वळणे टाळली जात असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी झाला आहे. तसेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे अंतरही सुमारे ६ किलोमीटरने कमी झाले आहे. सुरुवातीला हलकी वाहने आणि बसांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओमुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जाते का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.