Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मुंबई

Missing Link Project

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावर रोहित पवारांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप; 'नवयुगा' आणि 'ॲफकॉन्स'वर कारवाईची मागणी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.


मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावर रोहित पवारांचा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप नवयुगा आणि ॲफकॉन्सवर कारवाईची मागणी

बोगद्यात तडे, पाण्याची गळती आणि दरड कोसळल्यानंतर प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; साडेअठरा तासांनंतर मार्गिका अंशतः वाहतुकीसाठी खुली

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रकल्पाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या 'नवयुगा इंजिनिअरिंग' आणि 'ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर' या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या विधानांचाही उल्लेख केला. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, "आता इथून पुढे हा शेवटचा ट्रॅफिक असेल," असे सांगत हा मार्ग सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सक्षम असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतरही या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने त्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे पवार यांनी म्हटले.

यापूर्वी मिसिंग लिंकवरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे छायाचित्र समोर आले होते. त्यावेळी "कोणताही प्रकल्प स्थिर होण्यासाठी एक पावसाळा जाऊ द्यावा लागतो," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याची आठवण करून देत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. प्रकल्पाचे काम करताना केवळ स्पष्टीकरणे देण्यापेक्षा गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या बोगद्यामध्ये तडे पडले असून आतील भागातून पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत. इतक्या अल्पावधीत अशी परिस्थिती निर्माण होणे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. हा 'मिसिंग लिंक' प्रकल्प नसून "भ्रष्टाचाराला लिंकिंग करणारा मार्ग" असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

यासोबतच 'नवयुगा' कंपनीचा 'व्हीएसआर' कंपनीशी संबंध असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. व्हीएसआर कंपनीवर यापूर्वी कोणतीही कारवाई झाली नसतानाही मिसिंग लिंकसारखा महत्त्वाचा प्रकल्प नवयुगाला देण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण प्रकल्पात अनियमितता किंवा घोटाळा झाला असल्यास 'नवयुगा इंजिनिअरिंग' आणि 'ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर' या दोन्ही कंपन्यांवर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे.

दरम्यान, लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गिकेवर मोठी दरड कोसळली होती. या दुर्घटनेमुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरड कोसळताना सुमारे 100 टन मातीचा ढिगारा रस्त्यावर आला होता. त्यानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर बचाव व साफसफाईचे काम सुरू केले.

सुमारे साडेअठरा तासांच्या अखंड प्रयत्नांनंतर मिसिंग लिंक मार्गिका पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र, सध्या केवळ दोनच लेनवरून वाहनांची ये-जा सुरू ठेवण्यात आली आहे. कारण बोगद्याच्या वरच्या भागातून अद्यापही धबधब्यासारखे पाणी वाहत असून त्यासोबत लहान दगड खाली कोसळत आहेत. त्यामुळे या मार्गावरील संभाव्य धोका पूर्णपणे टळला आहे का, असा प्रश्न वाहनचालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले असून, प्रकल्पातील कामाच्या दर्जाबाबत तसेच संबंधित कंपन्यांच्या भूमिकेबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Related to this topic: