Minister Shivendra Singh Raje Bhosale: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रशासनाला सूचना
जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक; बियाणे, खते वितरणात सुसूत्रता ठेवावी
लातूर (Minister Shivendra Singh Raje Bhosale) : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो'चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक सज्जता ठेवावी. तसेच शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे व खत वापर याविषयी योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Minister Shivendra Singh Raje Bhosale) यांनी दिल्या.
खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भोसले (Minister Shivendra Singh Raje Bhosale) यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह पशुसंवर्धन विभाग, अग्रणी बँक, आत्मा, वन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते यांचा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच कृषि निविष्ठा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत. कोणत्याही तालुक्यात तुटवडा निर्माण होवू नये, यासाठी निविष्ठा वितरणात सुसूत्रता ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. तसेच महाबीज बियाणे वितरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
‘एल-निनो’मुळे मॉन्सूनमध्ये अनिश्चितता राहणार असल्याने शेतकऱ्यांना पेरणी योग्य कालावधीबाबत सातत्याने मार्गदर्शन करावे, कोणत्या कालावधीत कोणत्या पिकाची पेरणी करणे योग्य राहील, याबाबत जनजागृती करावी. तसेच संभाव्य परिस्थितीत दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध होईल, यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करावे. यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी दिल्या.
लातूर जिल्ह्यातील वृक्षांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना आहेत. त्यानुसार आगामी काळात जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. यासोबतच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कदम यांनी खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत माहिती दिली. आगामी खरीप हंगामात ४ लाख ८५ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन असून त्यासाठी ३ लाख ६४ हजार २४८ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी २ लाख ३६ हजार ७६१ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्यांचे एकूण १ लाख २७ हजार ४८७ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. रासायनिक खतांच्या सरासरी वापरानुसार यंदा १ लाख ४५ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता भासेल असा अंदाज आहे. त्यानुसार महिनानिहाय पुरेसे खतसाठा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. बोगस बियाणे, खत विक्री रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. ‘एल-निनो’ मुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजनाबाबत कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पर्यायी पीक पद्धती, योग्य वाण निवड, राखीव बियाणे साठा यासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे कदम यांनी सांगितले.
आमदार काळे, खासदार डॉ. काळगे, आमदार कराड यांनीही यावेळी अनुषंगिक सूचना दिल्या.